नलिनी ( ४)
तळव्यातला खोबऱ्याचा तुकडा नको वाटत होता. पण विद्या काकूच प्रेम होत ते. मी तो पदराला पुसला आणि खाल्ला.
दाजी समोरच्या ओसरीत बसून हिशोब करत होते. आज बैठकीत न बसता इथे का? आजचा शेतातला तोडा आणि मजुरीचा हिशोब शंकर आजोबा दाजीना सांगत होते. शंकर काका घरचेच होते. पण ते दिवाणजींच काम करायचे.
आईने गरम दुधाचा पेला त्यांच्या समोर ठेवला.
"सुनबाई , कशी सुरूय चिमणीच्या लग्नाची तयारी?"
"सुरूय हो. ऱोज काही ना काही काम निपटवण सुरू आहे. आज भाजणी करतेय. उद्या रुखवताच्या करंज्या आणि चकल्या करून घेऊ. ग्रहमका नंतर चिवडा लाडू. तुम्हाला आणि काकीना म्हणल की इथे या. ऐकत नाहीय तुम्ही. आपल सामान बांधा आणि या इथे. मी काकीना ही सांगितल होत. परत पाठवू का नलिनीच्या बाबाना?
" अग नको नको. इथे यायला इतक्या उपचारांची गरज नाहीय. माझ्याच नातीच लग्न आहे. कसला मान पान? पण तुझ्या काकीच्या हातून कुठलच काम होत नाही. त्यामुळे तिला संकोच वाटतो आहे की लग्नघरी आपल्या मुळे खोळंबा व्हायला नको. तिचा कामासाठी उपयोग काहीच होणार नाही. "
" कामाला कोणाला हव्या त्या? नुसत्या येऊन बसल्या तरी मला बळ येईल. मोठ बाई माणूस हव हो घरात कुणीतरी. एकटीने सतत मोठेपण घ्या.. मलाही लहान व्हाव वाटत न कुणी सल्ला दिला तर बर वाटत आपले पणानी. फार भांबावल्या सारख होत आहे मला. कुळाचारात काही चुकायला नको म्हणून जीव कासावीस होतो. पहील लग्न आहे घरातल. ते ही मुलीच. खूप उलघाल होते मनाची. दाजी आहेत. पण पाठीवरून हात फिरवणार कोणी हव आहे हो. बाई माणसाचा वेगळाच आधार असतो."
इतकच बोलून आईच्या डोळ्याला धारा लागल्या. शंकर काकांच्या आणि दाजींच्या पण डोळ्यात पाणी आल. मला सारखी सारखी ही वातावरण निर्मीती नको होती. उरलेले दिवस आनंदात घालवायचे होते. ही शालीनी कुठे जाऊन बसली आज?
परत वर जाऊन बसायची हिम्मत नव्हतीआत्या आजीक्गे डोळे आठवून पाठीतून सर्रकन कळ गेली. आज आई जवळ झोपू का? पण ती दहा प्रश्न विचारेल. त्या पेक्षा खोलीत बर.
"वहिनी हे बघा न सारण शिजून झाल का?"
हो म्हणत आई आत गेली. इतके वर्ष झाले तरी विद्या काकूला हे समजत नसेल अस नाहीच. पण इतका साधा निर्णय घ्यायच स्वातंत्र्य तिला का देत नाही आई? मला आईच्या बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत.
आणि विद्या काकूच्या त्याहून.. मुल झाल नाही हा तिचा एकटीचा दोष असल्यासारखे वागतात सगळे. उद्या माझ्यावर वेळ आली तर?
कसले अभद्र विचार सारखे मनात येतात आहेत आज? का रोमांचीत नाहीय मी? मला आठ दिवसानी स्वत: च्या घरी जायच आहे.
पुर्वेकडच्या छोट्या सारातून शालीनी आली. तिच्या हातात सामान होत. सगुणाने ते घेतल आणि आत आणल.
"काय आणल ग इतक?"
"अग ताई लाडू चिवडाचे पुडे आणि रुखवताच्या सामानासाठी टोपल्या.
आणि हे बघ... "
तिनी स्वयंपाक घरात हळूच डोकावून पाहील. कोणी येणार नाही अश्या अंदाजानी तिच्या बॅग मधून एक क्रीम काढल आणि काही गोल पुंगळ्या.
आम्ही व्हरांड्याच्या पायरीवर बसलो.
"हे काय आहे?" मी तिला कुजबुजत विचारल.
" ह्याला कर्लर्स म्हणतात. ती सिमा नाही का तिची मोठी बहीण पार्लर चा किर्स करते आहे मुंबईत. तिला आणायला सांगितले होते मी."
" पण काय उपयोग ग ह्याचा?"
हे अशे केसाला लाऊन ठेवले न की केस कुरळे होतात. तुला आवडतात न माझे कुरळे केस. "
"अग पण ते कसे वापरायचे?"
" तू कश्याला काळजी करते? मी शिकून आलीय तिच्याकडून."
" शाले, एक सांगू का?"
" हं! म्हणत शालीनी तिच्या वेणीशी खेळत होती. माझ्या आंदोलनांची तिला जाणीवच नव्हती. मी विचार केला तिला सांगू की नको. काही समजत नव्हत.
ती गाण गुणगुणत पाय हलवत वेणीशी खेळत होती.
मी आतल्या आत भितीच काहूर दाबायचा प्रयत्न करत होते.
क्रमश:
गायत्री ........
No comments:
Post a Comment