Monday, 15 July 2019


दाजी (१) 

ती भयाण रात्र मागे टाकत आयुष्य पुढे सरकणार होतच आणि ते सरकल.  आज ह्या वळणावर , जेंव्हा ह्या कुळातल्या तिन पिढ्यातल्या मुलीच माझ्या पहिल्या वहिल्या नातीच लग्न आठ दिवसांवर येऊन ठेपलेल असताना माझ्या मनाच्या समाधानाचा पेला काठोकाठ का वहात नाहीय? माझे मुल सुना नातवंड एकत्र कुटुंबात आहेत. मी सुखी माणसाचा सदरा घालून वावरतो आहे. अजूनही व्यवहार माझ्याच हातात आहेत. माझ्याच मर्जीनी सगळ घडत आहे. तरी मन सतत धास्तवलेल आहे.  हे लग्न पार पडून नलूबाई आपल्या घरी गेल्या की एका शापातून हा चिरेबंदी वाडा मुक्त होणार होता.


आक्का काल स्वप्नात दिसली. भेसूर हसत होती. नलिनीच्या चेहऱ्याच्या जागी ती दिसत होती. हिरवा शालू नेसून हिरवा चुडा घालून तिनी विहिरीत उडी मारली. आक्काला अग्नी दिला पण अखेरपर्यंत तिच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही.  तिच्या मागोमाग माईनी जीव सोडला. आका गेल्यावर अक्षरश: माईनी खंगून खंगून जीव सोडला. शेवटचे आठ दिवस  तर पाण्याचा थेंब नाही. सतत कुठल्यातरी तंद्रीत असायची. खांबाला टेकून बसली रहायची. नंतर नंतर ती आक्काशी बोलायची. बोलता बोलता रडायची. फडाफडा गालात मारून घ्यायची. माफ कर लेकरा माफ कर लेकरा अशी बडबड करत तिनी त्या विहीरीकडे पहात खांबाजवळच जीव सोडला. आक्का  गेली. सव्वा महिन्यात  माई गेली आणि वाडा अनाथ झाला.  

आक्काच्या पिंडाला शेवटी दर्भाचा कावळा लावला. दादासाहेब अपराधी पणाच्या ओझ्याखाली वाचा हरवून बसले. त्या काळात मी कसा जगलो आणि आयुष्य पुढे सरकवल हे आठवल की आजही अंगावर काटा  येतो. 

जीवाचा नुसता थरकाप होतो. नलिनी खूप निरागस आहे. तिच्या आयुष्यात फक्त सुख दे देवा. आक्कानी काल स्वप्नात येवून मला डावा कौल दिला. मुंडावळ्या बांधलेली आक्का विहिरीतून बाहेर येतेय ... दरदरून  घाम सुटला आणि जाग आली. आठ दिवसांवर लग्न आलेल,आणि नलिनी मात्र उदासवाणी वाटली आज. लेकरू खूप संयमी  आहे. कुठेही उथळपणा नाही.  मोठ्यांच्या   इच्छेला सतत मान देते. तिची इच्छा होती मुंबईला जाऊन लग्नाची तयारी करायची. पण मी नाही म्हणल. तिला साक्षगंधानंतर  होणाऱ्या नवऱ्याला एकदा तरी भेटावस वाटल असेल. पण मी  नकार दिला. इतक्या पिढ्यात लग्नाला उभी झालेली ह्या कुळातली पहिली मुलगी. आणि तिच्या नंतर मुली जगल्या. त्यामुळे नलिनीच्या सुखाला कोणाचीच दृष्ट लागू नये म्हणून मी तिला तिच्या छोट्या छोट्या इच्छाना  सतत मोडता घालतो. मला वाटणारा आनंद आणि समाधान मी जराही चेहऱ्यावर दिसू देत नाही  ते केवळ नलिनी सुखी व्हावी म्हणून. एकदा ती लग्न होऊन ह्या घराबाहेर पडली की हा पूर्ण वाडा शापमुक्त होणार होता. 

 मला  झोप लागेना. मी  बाहेर आलो  चौकातला पाळणा हलतो आहे का अस मला  वाटल. कड्यांचा  कुचकुच आवाज कानात आला. मला  आजकाल कमी दिसायच. मी  डोळे बारीक करून पाहील. कोणीतरी तिथे बसलेल होत.


भितीचा गोळा पोटात आला माझ्या. मी थरथर कापत पाळण्या जवळ आलो. 

"कोण?"    खूप दुरून आल्यासारखा माझा आवाज आला.

ती विद्या होती. सटकन उभी झाली. 

" दाजी, मला झोप नव्हती लागत. म्हणून ..."

" अग पण मध्यरात्री अस बाहेर एकटीने येऊन बसायची काय गरज? "


" मला खोलीत घुसमटल्या सारख झाल आणि तिथे मला जास्त भिती वाटते."

" भिती? कश्याची?"


ती काही न बोलता  खाली मान घालून उभी राहीली.

" बर जा आता आत. उद्या परत लवकर उठायच आहे. मांडव पडेल बाहेर. पाहुणे येतील. आणि तू तर मालतीचा उजवा हात आहेस...  त्यातही   नलिनी च लग्न. तू नलिनीवर किती जीव लावलेला आहे ते माहीती आहे मला. नलिनीच लग्न ..."

माझा गळा भरून आला..

विद्या नी पण डोळे  पुसले. ती निघाली. जाताजाता थांबली.

" दाजी, आज नलिनी खूप घाबरली होती संध्याकाळी."

" का?" 

" तिला आत्त्याबाईंच्या डोळ्यांची भिती वाटते म्हणे.  मलाही ते डोळे सतत पाठलागावर असल्या सारखे वाटतात... म्हणून मला खोलीपेक्षा इथे बसायला बर वाटत."

 एका श्वासात  बोलून विद्या थांबली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्याची भिती वाटत होती ते समोर येऊन उभ झाल. 

" मी आत्ता तिच्या जवळ झोपायपा जाणार होते. पण वहिनीना आवडत नाही.. आणि तिला जाताना दु:ख व्हायला नको कसलच. "

माझ्या कानात काहीही शिरत नव्हत.. काहीतरी करायला हव होत. येणार गंडांतर टळायलाच हव होत. काय कराव मला काही कळत नव्हत.  

" दाजी, दाजी.. काय झाल? किती घाम सुटला तुम्हाला? चला आत तुम्ही आधी. मग मी जाते."

ह्या लेकरानी पण खूप जीव लावला होता. मूक पणे सेवा करत रहाणे जणू तिचा धर्म होता.

" मी जातो. तू झोप आता. मी ठिक आहे.

" दाजी , आत्त्याबाईनी आत्महत्त्या का केली होती? आणि नलिनीला त्या का दिसत असतील?"


तिच्या प्रश्नानी मी दचकलो. पण हा प्रश्न इतक्या उघडपणे पहिल्यांदाच मला कोणी विचारला होता. आणि आता त्याच उत्तर कदाचीत पुढे येणार होत. विनाशाच वादळ घोंघावत दारात येऊन उभ झालेल होत. 


क्रमश: 

गायत्री ...

No comments:

Post a Comment